ऑकलंड - कर्णधार राणी रामपालने साकारलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने ऑलम्पिक विजेत्या ग्रेट ब्रिटनला मात दिली. आज (मंगळवार) ऑकलंडच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने १-० असा विजय मिळवला. भारताचा न्यूझीलंड दौऱ्यातील हा दुसरा विजय आहे.
राणी रामपालच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला सामन्याच्या पहिल्या काही मिनिटामध्येच पेनाल्टी कॉर्नर मिळाला. पण, याचे रुपांतर भारतीय खेळाडूंना गोलमध्ये करता आले नाही. भारतीय संघाने आपले आक्रमण जारीच ठेवले. पहिला हाफमध्ये दोनही संघाला गोल करता आला नाही.
दुसऱ्या हाफमध्ये पुन्हा भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाली. पण ही संधीही वाया गेली. तेव्हा राणी रामपालने ४७ व्या मिनिटाला शानदार गोल करत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. ही बढत भारताने शेवटपर्यंत राखली आणि ग्रेट ब्रिटनवर विजय मिळवला.
दरम्यान, भारतीय संघाने याआधी न्यूझीलंडच्या डेव्हलपमेंट संघाचा ४-० ने धुव्वा उडवला होता.
हेही वाचा - महिला हॉकी : न्यूझीलंडवर भारताचा ४-० ने विजय
हेही वाचा - भारतीय हॉकी संघाची डिफेंडर सुनिता लाकडाची निवृत्ती