नवी दिल्ली - पुढील महिन्यात एफआयएच प्रो लीगमधील भारताची देशांतर्गत स्पर्धेची शेवटची फेरी कोरोनामुळे रद्द झाली आहे. न्यूझीलंडच्या हॉकी संघाने प्रवासाच्या निर्बंधामुळे आशियाई दौरा रद्द केला. २३ आणि २४ मे रोजी भुवनेश्वर येथे भारत न्यूझीलंडशी खेळणार होता. न्यूझीलंडनेही महिला संघाचा चीन दौरा रद्द केला आहे.
हॉकी न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी इयान फ्रान्सिस म्हणाले, “न्यूझीलंड सरकारने लादलेल्या प्रवासी निर्बंध आणि लॉकडाऊन तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. आमचा पुरुष संघ भारत आणि महिला संघ चीनला जाणार नाही.”
यापूर्वी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने जुलै ते ऑगस्टपर्यंत प्रो लीग सामन्यांचा हंगाम वाढवण्याचे संकेत दिले होते. एफआयएच प्रो लीगमध्ये भारत चौथ्या तर न्यूझीलंड सहाव्या क्रमांकावर आहे. भारताने दोन सामने जिंकले आहेत.