चंदीगड - भारताचे दिग्गज माजी हॉकीपटू आणि प्रशिक्षक दिवंगत बलबीर सिंग सीनियर यांचे रविवारी चंदिगड येथे भावपूर्ण स्मरण करण्यात आले. याप्रसंगी नमित्त सुखमणी साहिब यांचे पठण आणि अंतिम अरदासही करण्यात आले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे मोहालीमध्ये वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. 8 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
चंदिगडच्या सेक्टर-36 मध्ये त्यांची मुलगी सुशबीर कौर यांच्या घरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोरोनाशी संबंधित आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र बत्रा, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि क्रीडामंत्री राणा गुरमीतसिंग सोधी यांनी बलबीर सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
पंजाब ऑलिम्पिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी डीजीपी राजदीपसिंग गिल, क्रीडा लेखक प्राचार्य सरवन सिंग यांनी बलबीर सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
बलबीर सिंग 1948, 1952 आणि 1956 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. ते 1952 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक बनले होते. या स्पर्धेत भारताने एकूण 13 गोल केले. यातील तब्बल 9 गोल बलबीर यांनी केले. यात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील हॅट्ट्रिकचा समावेश आहे. नेदरलँडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी 5 गोल केले. अंतिम सामन्यात एका खेळाडूंने केलेले हे सर्वाधिक गोल आहेत. हा एक विक्रम आहे. आजघडीपर्यंत कोणत्याही हॉकीपटूला हा विक्रम मोडता आला नाही. भारताने हा सामना 6-1 ने जिंकला होता.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने, आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील 16 महान खेळाडूची निवड केली होती. यात बलबीर सिंग यांचाही समावेश आहे.