नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघाने कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत गरीबांना मदत करण्यासाठी 20 लाख रुपये जमा केले आहेत. भारतीय संघाने ही रक्कम 18 दिवसांच्या 'फिटनेस चॅलेंज' मोहिमेअंतर्गत जमा केली. 17 एप्रिल रोजी सुरू झालेली ही मोहिम 3 मे संपली असून भारतीय संघाने एकूण 20,01,130 रुपये जमा केले.
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने या चॅलेंजबद्दल सांगितले, की आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषत: जगभरातील भारतीय हॉकीप्रेमींनी या आव्हानाला हातभार लावला आणि योगदान दिले आहे. भारतीय संघाच्या वतीने मी त्या सर्व लोकांचे आभार मानते. गरिबांच्या मदतीसाठी ज्यांनी या मोहिमेमध्ये भाग घेतला त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते.
फिटनेस चॅलेंजमध्ये संघातील सदस्याला बर्पीज, लँग्स, स्क्वॅट्स, स्पायडर मॅन पुश अप्स, पोगो हॉप्स इत्यादी विविध फिटनेस संबंधित व्यायामप्रकार देण्यात आले होते. फिटनेस चॅलेंजमधून उभी केलेली रक्कम दिल्लीस्थित स्वयंसेवी संस्था उदय फाउंडेशनला दान करण्यात आली आहे. हा निधी आता रूग्ण, स्थलांतरित कामगार आणि गरीब लोकांच्या मूलभूत गरजांसाठी विविध ठिकाणी वापरला जाईल.