रायपूर: इंडो-तिबेटीय बॉर्डर पोलीस(आयटीबीपी)दलाच्या एका हेड कॉन्स्टेबलने नक्षलग्रस्त भागातील मुलींना सक्षम करण्यासाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे. त्यांनी छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील मुलींना हॉकीचे प्रशिक्षण देत एक संघ तयार केला आहे. चार वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या मेहनतीला आता यश आले आहे. या मुली आता राष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सज्ज झाल्या आहेत.
बस्तर परिसरात येणाऱ्या मर्डपाल कन्या आश्रम या शाळेत शिकणाऱया या मुलींची ज्युनियर हॉकी राष्ट्रीय चाचणी शिबिरासाठी निवड झाली आहे. चार वर्षांपूर्वी कट्टर डाव्यांच्या बंदोबस्तासाठी आयटीबीपीची ४१बटालियन याठिकाणी तैनात केली होती. हॉकी प्रशिक्षक आणि हेड कॉन्स्टेबल असलेल्या सुर्या सुमित यांनी या मुलींची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, आयटीबीपीने या मुलींना सरावासाठी शक्य त्या सोयीसुविधा पुरवल्या, अशी माहिती आयटीबीपीच्या एका अधिकाऱयाने दिली.
आयटीबीपी हेलिपॅडवर या मुलींचा सराव घेत असे. कारण ही जागा मुलींसाठी सर्वात सुरक्षित होती. कमीत-कमी साधनांचा वापरकरून या मुलींचा सराव घेतला जातो. या मुली नक्षलग्रस्त बस्तरमधील महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक आदर्श उदाहरण आहेत. यातील तीन मुलींची ज्युनियर गटात निवड झाली आहे तर सहा मुलींची सिनियर गटात निवड झाली आहे. २० दिवस त्यांचे प्रशिक्षण शिबिर चालणार आहे.
अतिशय दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या कुटुंबांमधील या मुलींची हॉकी खेळणारी ही पहिलीच पिढी आहे. १४ ते १७ वयोगटातील या मुली आहेत. सेवंती पोयम, तनीषा नाग, सुकमती मांडवी, सुकरी मांडवी, सुमणी कश्यप, सुलोचना नेताम, सावित्री नेताम, संजीनी सोडी, आणि धनेश्वरी कोराम यामुलींची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे. त्यांना हॉकी इंडियाच्यावतीने विशेष ओळखपत्रेही देण्यात आली आहे.