नवी दिल्ली - भारतातील हॉकीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हॉकीचे जादुगार म्हटले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. १९७५च्या विश्वकरंडक विजेत्या हॉकी संघाचे महत्त्वाचे सदस्य आणि मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या बायोपिकविषयी माहिती दिली.
हेही वाचा -
रॉनी स्क्रूवाला करणार चित्रपटाची निर्मिती -
इश्किया व सोनचिडीया यांसारखे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित करणारे अभिषेक चौबे या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. बॉलिवूडमधील प्रख्यात चित्रपट निर्माता असलेले रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करतील. ''१५०० हून अधिक गोल, तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके आणि भारताच्या अभिमानाची कहाणी. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, अभिषेक चौबे यांच्यासोबत मिळून आम्ही हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावरील चित्रपट बनवत आहोत'', असे रॉनी स्क्रूवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.
अशोक कुमार म्हणाले, "जेव्हा मी भोपाळमध्ये माझ्या कोचिंग पदावर होतो तेव्हा वडिलांवर चित्रपट बनवण्याच्या इच्छेने रोहित वैद यांनी माझ्याकडे संपर्क साधला. मी प्रथमच त्याला ऐश्वरबाग स्टेडियमवर भेटलो. मी माझ्या कुटुंबाशी बोललो. आणि ध्यानचंद यांच्या जीवनावर चित्रपट तयार होईल याचा त्यांना आनंद होता." काही माध्यमांच्या वृत्तानुसार अभिनेता रणबीर कपूर ध्यानचंद यांची भूमिका साकारणार आहे.
ध्यानचंद यांची कारकीर्द -
मेजर ध्यानचंद यांना जगातील तसेच भारतातील आजवरचे सर्वोत्कृष्ट हॉकीपटू मानले जाते. जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर यानेदेखील ध्यानचंद यांच्या खेळाची प्रशंसा केली होती. ध्यानचंद यांनी आपल्या कारकीर्दीत भारताला १९२८ ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिक, १९३२ लॉस ऐंजिलीस ऑलिम्पिक व १९३६ बर्लीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. ध्यानचंद यांच्या नावे आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये १८५ सामन्यात विश्वविक्रमी ५७० गोलची नोंद आहे. ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय क्रीडादिवस साजरा केला जातो.