माद्रिद - युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी टॉटेनहॅम आणि लिव्हरपूल या दिग्गज संघामध्ये अंतिम लढत रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना आज रात्री १२.३० वाजता माद्रिद येथिल वांडा मेट्रोपोलिटन फुटबॉल स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.
यदांच्या युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारे दोन्ही संघ हे इंग्लंडमधील असून, २००८ नंतर पहिल्यादांच असे घडले आहे. लिव्हरपूलने सेमीफायनलमध्ये मोठा उलटफेर करत बलाढ्य बार्सिलोनाचा ४-० ने धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. तर टॉटेनहॅम लुकास मौउराने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर अयाक्सचा पराभव करत पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
अंतिम सामन्यात टॉटेनहॅमच्या लुकास मौउरा, हॅरी केन आणि क्रिस्चियान एरिक्सन तर लिव्हरपुलच्या मोहम्मद सलाह आणि रॉबेर्ट फर्मिनो स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर पूर्ण फुटबॉलविश्वाचे लक्ष असणार आहे.
लिव्हरपूलच्या संघाने आजवर पाच वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले आहे. तर टॉटेनहॅमला एकदाहि जेतेपदावर आपले नाव कोरता आले नाहीय.