नवी दिल्ली - फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेनचा (पीएसजी) फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेने आपल्या भविष्याबद्दल सर्व अनुमान फेटाळून लावले आहे. पुढील हंगामापर्यंत पीएसजीमध्ये राहणार असल्याचे एम्बाप्पेने सांगितले. प्रीमियर लीग विजेता लिव्हरपूल आणि स्पॅनिश लीग विजेता रिअल माद्रिदसाठी एम्बाप्पेने रस दाखवला होता.
"क्लबचे 50 वे वर्ष हे क्लब, चाहत्यांसाठी, प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी इथेच राहीन. मी संघासमवेत ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेन आणि मी सर्वोत्तम कामगिरी करेन", असे एम्बापने एका वृत्तसंस्थेला सांगितले.
21 वर्षीय एम्बाप्पे हा फुटबॉलमधील चांगला खेळाडू मानला जातो. त्याने मोनाको आणि पीएसजीसह चार वेळा फ्रान्स लीगचे जेतेपद जिंकले आहे. 2018 मध्ये तो वर्ल्डकप जिंकणार्या फ्रान्स संघाचा सदस्य होता.
यावर्षीही त्याने क्लबसाठी शानदार प्रदर्शन केले. जरी कोरोनामुळे हा हंगाम रद्द झाला असला, तरीही त्याने क्लबसाठी एकूण 33 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 30 गोल केले आहेत. तर, 17 गोलसाठी असिस्ट केले आहे.