नवी दिल्ली - कोरोनाचे संकट अजूनही जगभर कायम आहे या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, बोलिव्हिया फुटबॉल महासंघाचे 58 वर्षीय अध्यक्ष सेजार सेलिनास यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघाने रविवारी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. कोरोनाची लागण झाल्यानंतर सेलिनास यांना या महिन्यात ला-पाझमधील खासगी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते.
बोलिव्हिया क्लब 'द स्ट्रॉन्गेस्ट'चे माजी अध्यक्ष असलेले सेलिनास 2018 मध्ये नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष झाले. या नियुक्तीमुळे त्यांना दक्षिण अमेरिकन फुटबॉल संघ कॉन्मेबॉलच्या कार्यकारी समितीत स्थान मिळाले.
अद्यायावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 46 लाख 33 हजार 37 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाख 8 हजार 539 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 87 लाख 30 हजार 163 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.