बार्सिलोना - स्पेनचा फुटबॉल क्लब बार्सिलोनाने ला लीगा स्पर्धेत वॅलेंशिया संघाविरुद्धच्या सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. या सामन्याच्या पहिल्या सत्रात स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने गोल नोंदवत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. मेस्सीने ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या (क्लबकडून खेळताना) सर्वाधिक गोलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
हेही वाचा - योगायोगाचा १९ डिसेंबर!...एकाच दिवशी भारताने रचली उच्चांकी आणि निचांकी धावसंख्या
वॅलेंशियाविरुद्ध खेळताना मेस्सीने बार्सिलोनासाठी आपला ६४३वा गोल केला. पेले यांनी सुद्धा क्लब सांतोसकडून खेळताना ६४३ गोल केले होते. ३३ वर्षीय मेस्सीने सुंदर हेडरने वॅलेंशियाविरुद्ध गोल केला. रोनाल्ड अराझोने बार्सिलोनासाठी दुसरा गोल केला. तर, वॅलेंशियासाठी मॉक्टार डायखाबी आणि मॅक्सिमिलियानो गोन्झालेझने गोल केले. हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण मिळाला.
बार्सिलोनाचा संघ आता १३ सामन्यांत २१ गुणांसह ला लीगाच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरला आहे. अव्वल स्थानावर अॅटलेटिको माद्रिदचा संघ आहे.