व्हिटोरिया - स्पॅनिश फुटबॉल लीग ला-लीगामध्ये अंतिम फेरीत बार्सिलोनाने अलावेसवर 5-0 अशी सरशी साधली. या विजयासह बार्सिलोनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने 'गोल्डन बूट' आपल्या नावावर केला.
ला-लीगामध्ये विक्रमी सातव्यांदा सर्वाधिक गोल नोंदवताना मेस्सीने हा 'गोल्डन बूट' मिळवला. मेस्सीने लीगमध्ये एकूण 25 गोल केले आहेत. या सामन्यात मेस्सीने दोन गोल केले. मेस्सीने प्रतिस्पर्धी करीम बेंझेमापेक्षा चार गोल जास्त केले आहेत. बेंझेमाला रियलने माद्रिद आणि लेगनेस यांच्यातील सामन्यात गोल नोंदवता आला नाही. लीगमध्ये सात वेगवेगळ्या सत्रात सर्वाधिक गोल करणारा मेस्सी हा पहिला खेळाडू ठरला.
दुखापतीमुळे हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात न खेळताही त्याने हे लक्ष्य साधले. अर्जेंटिनाच्या या दिग्गज फुटबॉलपटूने 33 सामन्यात 25 गोल नोंदवले आहेत. ''वैयक्तिक कामगिरी नंतर येते. आम्ही जेतेपद जिंकण्यातही यशस्वी झालो असतो तर बरे झाले असते", असे मेस्सी या विक्रमानंतर म्हणाला.
अलावेसविरूद्धच्या सामन्यात बार्सिलोनाकडून अंशु फाटी, लुईस सुआरेझ आणि नेल्सन सेमेडो यांनीही गोल केले. बार्सिलोना रिअल माद्रिदनंतर या लीगमध्ये दुसर्या स्थानावर आहे. रिअल माद्रिदने या लीगचे जेतेपद पटकावले आहे.