बार्सिलोना - फूटबॉलविश्वातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी आपली कारकीर्द बार्सिलोना संघाकडून खेळताना संपुष्टात आणेल, असे बार्सिलोनाचे अध्यक्ष जोसेफ मारिया बाटरेमेयू यांनी म्हटले आहे. इटलीचा क्लब इंटर मिलान मेस्सीबरोबर चार वर्षाचा करणार असल्याच्या चर्चा फुटबॉलविश्वात होत आहेत. यासाठी मेस्सीला वर्षाला ५० मिलियन युरो मिळणार होते.
बाटरेमेयू यांनी मात्र या चर्चांना फेटाळून लावले आहे. एका वृत्तसंस्थेला बाटरेमेयू यांनी सांगितले, ''मी एकटाच हे सांगत नाही, याबद्दल मेस्सी स्वत: हून म्हणाला आहे. बार्सिलोना येथे त्याला त्याची व्यावसायिक कारकीर्द संपवायची आहे आणि त्यांच्यासाठी हा एकमेव क्लब आहे. पुढील तीन-चार वर्षांत बार्सिलोनाकडून मेस्सी फूटबॉलला निरोप देईल, यात मला शंका नाही."
मेस्सीचा २०२१ पर्यंत बार्सिलोनाबरोबर करार आहे. त्यानंतर तो क्लबला निरोप देऊ शकतो. विनामूल्य सोडू शकतो. यंदाच्या ला-लीगमध्ये अंतिम फेरीत बार्सिलोनाने अलावेसवर ५-० अशी सरशी साधली. या विजयासह मेस्सीने 'गोल्डन बूट' आपल्या नावावर केला. दुखापतीमुळे हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात न खेळताही त्याने हे लक्ष्य साधले. अर्जेंटिनाच्या या दिग्गज फुटबॉलपटूने ३३ सामन्यात २५ गोल नोंदवले आहेत.
बार्सिलोना रिअल माद्रिदनंतर या लीगमध्ये दुसर्या स्थानावर आहे. रिअल माद्रिदने या लीगचे जेतेपद पटकावले आहे.