नवी दिल्ली - दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि सहा वेळा फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टन यांना 'लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांच्या २० वर्षांच्या इतिहासात प्रथमच या दोन दिग्गज खेळाडूंना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला. सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये लॉरियस पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
नदाल आणि वुड्सला पछाडले -
पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सी आणि हॅमिल्टनने अनुभवी गोल्फर टायगर वुड्स, टेनिस स्टार राफेल नदाल, धावपटू इलियट किपकोगे आणि मोटारसायकल रोड रेसर मार्क मार्केझचा पराभव केला. मेस्सी आणि हॅमिल्टन यांना समान मते मिळाली.
हेही वाचा -VIDEO : "एकमेकांचे कांदे-बटाटे खाऊ शकतो, तर क्रिकेट का खेळू शकत नाही?"
मेस्सी पुरस्कार सोहळ्यात सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे त्याने एका व्हिडिओ संदेशामध्ये आयोजकांची माफी मागितली. 'मला इथे यायचे होते पण दुर्दैवाने येऊ शकलो नाही', असे मेस्सी व्हिडिओमध्ये म्हणाला. विशेष बाब म्हणजे, या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेतून केली जाते. यासाठी काही दिवसांपासून मतदान प्रक्रिया घेण्यात आली.