पॅरिस - फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मेनचा (पीएसजी) युवा फुटबॉलपटू किलीयन एम्बाप्पेला आगामी हंगामानंतर क्लब सोडण्याची इच्छा आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, एम्बाप्पेचा पीएसजीबरोबर २०२२ पर्यंत करार आहे.
वृत्तानुसार, रियल माद्रिद, मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड आणि बार्सिलोना हे संघ फ्रान्सच्या विश्वचषक विजेता सदस्य असलेल्या एम्बाप्पेला संघात घेऊ शकतात. २१ वर्षीय एम्बाप्पेवर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. एम्बाप्पेने मोनाकोकडून खेळताना एकदा आणि पीसजीकडून खेळताना तीन अशा चार वेळा फ्रान्स लीगचे जेतेपद जिंकले आहे. २०१८मध्ये तो विश्वकरंडक जिंकणार्या फ्रान्स संघाचा सदस्य होता.
एम्बाप्पे अलीकडेच कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह सापडला होता. त्यामुळे तो यूएफा नेशन्स लीगमधील क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. एम्बाप्पेला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तो घरी क्वारंटाइन होता. स्वीडन विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने गोल करत संघाला १-० असा विजय मिळवून दिला.
कोरोनाची लागण झालेला तो पीएसजीचा सातवा खेळाडू आहे. त्यापैकी एक असलेला स्टार फुटबॉलपटू नेमार कोरोनामुक्त झाला आहे.