नवी दिल्ली - कोरोनामुळे संपूर्ण जगाची गती मंदावली आहे. या व्हायरसचा फटका अनेक क्षेत्रांना बसला असून क्रीडाक्षेत्रही या व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. पोर्तुगालचा आणि जुव्हेंटसकडून खेळणारा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही या व्हायरसचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
कोरोनामुळे आर्थिक गर्तेत सापडलेला इटलीचा फुटबॉल क्लब जुव्हेंटस त्यांचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे दुसऱ्या क्लबला हस्तांतरण करू शकतो. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होत असल्याचे म्हटले जात आहे. रिपोर्टनुसार, रोनाल्डो त्याच्या जुन्या क्लब मँचेस्टर युनायटेड किंवा पॅरिस सेंट जर्मेन क्लबमध्ये सहभागी होऊ शकतो.
इटालियन माध्यमांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती सामन्य झाल्यानंतर, रोनाल्डोसारख्या मोठ्या पगाराच्या खेळाडूंचा खर्च जुव्हेंटसला घेणे अवघड होईल. रोनाल्डोचे आठवड्याचे मानधन ५ दशलक्ष पौंड (अंदाजे ४.६६ कोटी रुपये) आहे. मात्र, जुव्हेंटसने रोनाल्डोला सोडण्याचे ठरवले तर त्याची हस्तांतर किंमत २८ टक्क्यांनी कमी होऊ शकते. माध्यमांच्या वृत्तानुसार, जुव्हेंटसने रोनाल्डोला ८ अब्ज एवढी किंमत मोजून संघात घेतले होते.
असे असले तरी, क्लबला आर्थिक संकटापासून मुक्त करण्यासाठी रोनाल्डोसह इतर खेळाडू आणि संघाचे मॅनेजर मारिजिओ सेरी हे चार महिन्यांच्या मानधनात कपात करण्यास तयार आहेत. रोनाल्डो आणि मॅनेजरने एकूण ७५२ कोटी रुपये (९० दशलक्ष युरो) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये जुव्हेंटसबरोबर रोनाल्डोने चार वर्षांचा करार केला आहे.