बंगळुरू - भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा फुटबॉल नियामक संस्था फिफाने कोरोनाविरूद्धच्या मोहिमेत समावेश केला आहे. यात छेत्री व्यतिरिक्त सध्याच्या आणि माजी फुटबॉलपटूंमधील २८ खेळाडूंचा समावेश आहे. फिफा आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी संयुक्तपणे ही कोरोना विषाणूविरूद्ध जागरूकता मोहीम राबवली आहे.
हेही वाचा - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ब्राझीलमधील मैदान ठरणार वरदान!
फिफाद्वारे निवडलेले हे २८ खेळाडू ११ भाषांमधील लोकांना व्हिडिओद्वारे कोरोनाशी लढण्यासाठी संदेश देतील. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार छेत्री, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, विश्वचषक विजेता फ्लिप लाम, इकर कॅसिलास आणि स्पेनचा बचावपटू कार्लेस पुयोल यांचा समावेश आहे.
ही मोहीम स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथील डब्ल्यूएचओ मुख्यालयात सुरू करण्यात आली आहे.