मस्कत - ओमान विरुध्द मंगळवारी होणारा सामना सुनील छेत्री कंपनीसाठी 'करो या मरो' असा आहे. फिफा विश्व कप क्वालिफायर (FIFA World Cup qualifier) स्पर्धेसाठी भारताला विजय आवश्यकच आहे. मात्र, इतिहास पाहता ओमानचे पारडे जड आहे. पण भारतीय संघ या सामन्यात उलटफेर करेल, अशी अपेक्षा चाहत्यांमधून व्यक्त होत आहे.
FIFA World Cup qualifier स्पर्धेसाठी झालेल्या ४ सामन्यात, तीन ड्रॉ आणि एक पराभव असा प्रवास भारतीय संघाचा रहिला आहे. आता भारताला विजय आवश्यकच आहे. तेही ओमान विरुध्द. या सामन्यापूर्वी, आम्ही विजयासाठी मैदानात उतरु, असे सुनील छेत्रीने सांगितले आहे.
मागील इतिहास पाहता भारत आणि ओमान संघात एकूण ८ सामने झाली आहेत. यातील ५ सामने ओमानने जिंकली आहेत. तर २ सामने ड्रॉ झाली आहे. एक सामना भारतीय संघाने जिंकला आहे.
चिंतेची बाब म्हणजे, भारतीय संघ ओमानला मागील २५ वर्षात एकदाही पराभूत करु शकलेला नाही. ओमानविरुध्दच्या एकमात्र विजय भारतीय संघाने १९९४ मध्ये ४-१ ने मिळवला होता.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात भारत विरुध्द ओमान संघात सामना झाला होता. या सामन्यात सुनील छेत्रीने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. ती आघाडी संघाने शेवटपर्यंत टिकवली देखील. मात्र, शेवटच्या १० मिनिटात ओमानने २ गोल करत भारताला पराभूत केले होते.
FIFA World Cup qualifier च्या ग्रुप ई मध्ये भारतीय संघ ३ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर ओमानने चार सामन्यात खेळताना ९ गुणाची कमाई केली आहे. ग्रुप ई मध्ये कतारचा संघ अव्वलस्थानी आहे.
ओमानविरुध्दच्या सामन्यानंतर भारतीय संघ २६ मार्चला कतार, ४ जूनला बांगलादेश आणि ९ जूनला अफगाणिस्तान विरुध्द सामना खेळणार आहे. मात्र, ओमानविरुध्दचा सामना जिंकल्यानंतरच 'त्या' सामन्यांना महत्व राहिल.