फिफाच्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाला २ स्थानांचा फायदा झाला असून ताज्या क्रमवारीत भारतीय संघाने १०१ वे स्थान पटकावले आहे. सध्या भारताच्या खात्यात 1219 गुण आहेत.
आशियाई देशांच्या क्रमवारीचा विचार केला असता, भारत 18 व्या स्थानावर आहे. या क्रमवारीत इरानचा संघ २१ व्या स्थानी असून आशियाई संघामध्ये तो अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर जपान (26), दक्षिण कोरिया (37), ऑस्ट्रेलिया (41) आणि कतार (55) यांचा क्रमांक लागतो.
एएफसी आशियाई चषकात साखळी फेरीतच दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. आशियाई चषकात बहारिनकडून पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.
फिफाच्या जागतिक क्रमवारीचा विचार केला असता बेल्जियमचा संघ 1737 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर विश्वचषक विजेता फ्रान्सचा संघ 1734 गुणांसह दुसऱ्या आणि पाच वेळा विश्वचषक विजेता असलेला ब्राझीलचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.