दोहा - ओमानविरुद्ध झालेल्या धक्कादायक पराभवानंतर भारताला आज कतारशी सामना करावा लागणार आहे. फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध कतारचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे, भारत या आशियाई विजेत्या कतारसमोर कसे खेळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका?.. 'नको रे बाबा'
ओमानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने भारताला सुरुवातीलाच यश मिळवून दिले. मात्र अखेरच्या ८ मिनिटांत दोन गोल स्वीकारल्यामुळे भारताने हा सामना गमावला. २०११ मध्ये भारताने कतारविरुद्धच्या मैत्री सामन्यात २-१ ने बाजी मारली होती, पण तो अधिकृत सामना नव्हता.
कतारविरुद्ध भारताची विजयाची आकडेवारी चांगली नाही. कतारने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, एक सामना टाय झाला होता. विश्वचषक पात्रता फेरीत सप्टेंबर २००७ ला या दोन संघात सामना झाला होता. त्यावेळी कतारने भारताचा ६-० ने धुव्वा उडवला होता.
'आम्ही कतारविरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत. समोरच्या संघाला कठीण आव्हान देण्याचा प्रयत्व आम्ही करणार आहोत. छोट्या चुका टाळल्या पाहिजेत. अशा चुकांमुळेच ओमानविरुद्ध आम्ही तीन गुण गमावले, त्यामुळे कतारविरुद्ध चांगले खेळावे लागणार आहे', असे भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने सांगितले आहे.