रिओ दि जानेरो - ब्राझीलमधील स्थानिक सामन्यापूर्वी एका विमान अपघातात चार खेळाडू आणि ब्राझिलियन फुटबॉल क्लब पालमासचे अध्यक्ष यांचा मृत्यू झाला आहे. क्लबच्या वृत्तानुसार, ब्राझीलच्या उत्तरेकडील पालमास शहराजवळील टोकनटेनस एअरफिल्ड येथे विमानाने उड्डाण घेतल्यानंतर हा अपघात घडला. यात क्लबचे अध्यक्ष लुकास मीरा आणि लुकास प्रॅक्सिडीज, गिलहेल्म नो, रानुल आणि मार्कस मोलिनारी या खेळाडूंचा मृत्यू झाला.
हेही वाचा - ..म्हणून कुलदीपच्या जागी सुंदरला निवडलं, अजिंक्यने सांगितलं कारण
या अपघातात विमानाचा पायलटही मरण पावला आहे. आज सोमवारी या क्लबचा सामना व्हिला नोव्हा विरुद्ध रंगणार होता. हे खेळाडू आणि क्लबचे अध्यक्ष मुख्य संघाव्यतिरिक्त प्रवास करत होते. कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित खेळाडू क्वारंटाइन कालावधीत होते. त्यामुळे या खेळाडूंना मुख्य संघासोबत जाता आले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुर्घटनाग्रस्त विमान हे दोन इंजिनचे बॅरॉन मॉडेल विमान होते. दुर्घटनेनंतर आग लागली. घटनेमागील कारण तपासले जात आहे.
पाच वर्षांपूर्वी कोलंबियामध्ये अशाच विमान अपघातात १९ खेळाडूंचा मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये ब्राझीलमध्येच हेलिकॉप्टर अपघातात माजी आंतरराष्ट्रीय आणि ब्राझीलचा फुटबॉलपटू फर्नांडोचा मृत्यू झाला होता.