नवी दिल्ली - पोर्तुगालचा खेळाडू आणि फुटबॉलविश्वात दिग्गज म्हणून ओळखला जाणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. रोनाल्डोने पुढील वर्षात आपली फुटबॉल कारकिर्द संपवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
रोनाल्डो सध्या इटली लीगचा विजेता असलेल्या जुवेंटस संघाकडून खेळत आहे. एका मुलाखतीमध्ये रोनाल्डोने आपल्या निवृत्तीबद्दल सांगितले. तो म्हणाला, 'मी निवृत्तीबाबत विचार नाही करत. पण, कदाचित पुढच्या वर्षी मी माझी कारकिर्द संपवू शकतो. किंवा कदाचित ४०-४१ वयापर्यंत खेळूही शकतो.'
रोनाल्डोने पाच वेळा सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटूचा मान मिळवला आहे. तो पुढे म्हणाला, 'मला माहित नाही. मी नेहमी म्हणतो की, प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. कोणत्याही खेळाडूने माझ्यापेक्षा जास्त विक्रम केलेले नाहीत.'
मागील वर्षी जुवेंटस संघाकडून खेळताना रोनाल्डोने इटली लीगचे विजेतेपद पटकावले होते. रोनाल्डोने ४३ सामन्यांत २८ गोल केले होते. त्याने ला लीगामध्ये रियल माद्रिदचे प्रतिनिधित्व करताना २९२ सामन्यांत ३११ गोल्स केले आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये त्याने मँचेस्टर युनायटेडकडून १९६ सामन्यांत ८४ गोल्स केले आहेत.