नवी दिल्ली - फुटबॉल नियामक संस्था फिफाने कोरोना व्हायरसमुळे नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी १७ वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा तहकूब करण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिफाच्या कार्यकारी गटाने हा निर्णय घेतला असल्याचे फिफाने म्हटले आहे.
या निर्णयासोबतच, कार्यकारी गटाने २० वर्षाखालील महिला विश्वकरंडक स्पर्धा (पनामा-कोस्टा रिका) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा यंदा ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान होणार होती. नव्या तारखांची घोषणा नंतर केली जाईल, असे फिफाने सांगितले. भारतात होणारी १७ वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा पाच शहरांमध्ये २ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार होती.