नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघाचा बचावपटू संदेश झिंगन इंडियन सुपर लीग (आयएसएल) संघ केरला ब्लास्टर्सपासून वेगळा होऊ शकतो. एका वृत्तानुसार, झिंगन आयएसएलच्या पहिल्या आवृत्तीपासून केरला ब्लास्टर्सबरोबर खेळत आहे. झिंगन हा या संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारा फुटबॉलपटू आहे.
एका अहवालानुसार केरला ब्लास्टर्सला सध्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या संघातील अनेक खेळाडूंच्या मानधनातही कपात होणार आहे. त्यामुळे बरेचसे खेळाडू या निर्णयाशी सहमत नसून ते क्लब सोडण्याच्या तयारीत आहेत.
26 वर्षीय झिंगनने केरला ब्लास्टर्सचे कर्णधारपदही भूषवले आहे. या संघात राहूनच त्याची कारकीर्द उदयास आली. झिंगनने पहिल्या सत्रात क्लबसाठी 14 सामने खेळले होते. त्याने आतापर्यंत ब्लास्टर्ससाठी विक्रमी 76 सामने खेळले आहेत.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) अर्जुन पुरस्कारासाठी झिंगन आणि महिला संघाची स्ट्रायकर बाला देवी यांच्या नावांची शिफारस केली आहे.