गोंदिया - हुतात्मा जवानांच्या स्मृती पित्यर्थ अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन गोंदिया जिल्ह्यात करण्यात आले आहे. गोंदियाच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ३ मार्च ते ८ मार्च या कालावधीदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.
जिल्हा पोलीस विभाग व जिल्हा फुटबॉल असोसिएशन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नॉक-आउट पध्दतीने खेळण्यात येणार असून विजेत्या संघाला एक लाख तर उपविजेत्या संघाला ७५ हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. या शिवाय दोन उत्कृष्ट खेळाडूंना विशेष आकर्षक पारितोषिक दिले जाणार आहेत. तसेच ८ मार्चला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सायंकाळी ५ वाजता महिला संघात फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्या संघाला ११ हजार रूपये व उपविजेत्या संघाला ६ हजार रूपयांचे बक्षीस व चषक देण्यात येणार आहे
या संघांनी घेतला सहभाग -
अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील रब्बानी क्लब कामठी, न्यु स्पोर्टिग सॉकर क्लब चरचा छत्तीसगड, चेन्नई कस्टॅम चेन्नई, एम. ई. जी. बंगळुरू आर्मी, बी. ई. जी. पुणे, एअर इंडिया मुंबई, बालाघाट जिल्हा फुटबॉल असोसिएशन, गोंदिया जिल्हा फुटबॉल असोसिएशन, आर्टिलरी सेंटर हैदराबाद आर्मी, राहुल क्लब नागपुर, महाराष्ट्र पोलीस मुंबई, जम्मू-कश्मीर पोलीस या संघांनी सहभाग नोंदवला आहे.