नवी दिल्ली - अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी फुटबॉलपटू गुरप्रीत सिंग संधू आणि जेजे लाल्पेखलुआ यांची शिफारस केली आहे. भारतीय फुटबॉलमध्ये आजवर दिलेल्या योगदानासाठी एआयएफएफने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे या २ खेळाडूंच्या नावांची शिफारस केली आहे.
भारताचा दिग्गज फुटबॉल खेळाडू सुनील छेत्रीनंतर संधू आणि जेजे हे सध्या भारताच्या राष्ट्रीय संघात असलेले सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. गुरप्रीत युरोपियन लीगमध्ये स्टॅबेक एफसी क्लबकडून खेळला होता. युरोपियन लीगमध्ये खेळणारा गुरप्रीत हा पहिलाच भारतीय फुटबॉल खेळाडू ठरला होता.
लाल्पेखलुआनेही भारतीय फुटबॉल संघासाठी वेळोवेळी महत्वाची भूमिका निभावली आहे. २०११ मध्ये त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. जेजेने आतापर्यंत भारतीय संघासाठी खेळताना २३ गोल केले असून तो सध्या इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नइयन एफसी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.