नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जग हादरले असून या व्हायरसचा फटका क्रीडाविश्वालाही बसला आहे. चेल्सी आणि जुव्हेंटसच्या खेळाडूनंतर, इटलीच्या ११ फूटबॉलपटूंना या व्हायरसची लागण झाली आहे.
हेही वाचा - बीसीसीआयने केलेल्या हकालपट्टीनंतर मांजरेकरांनी तोडले मौन, म्हणाले...
इटलीतील फुटबॉल लीग सीरी-एच्या तब्बल ११ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या लीगमध्ये २० संघ सहभागी झाले आहेत. मात्र फुटबॉलपटूंनाच कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टरांनी इतर खेळाडूंच्या सरावाला मज्जाव करून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
चेल्सी या आघाडीच्या फुटबॉल क्लबचा खेळाडू कॅलम हडसन-ओडोईला कोरोनीची लागण झाली. कॅलम हडसन-ओडोई हा कोरोनाची लागण झालेला प्रीमियर लीगचा पहिला खेळाडू ठरला. शिवाय, अर्सेनाल या फुटबॉल क्लबच्या मुख्य प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मायकेल अर्टेरा असे या प्रशिक्षकाचे नाव आहे. त्यानंतर, दिग्गज फुटबॉलपटू खिस्तियानो रोनाल्डोचा संघ सहकारी डॅनियन रुगानीला कोरोना झाला असल्याचे समोर आले आहे.
रोनाल्डोने जगभरातील आपल्या चाहत्यांना कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. त्यासोबतच त्याने पोर्तुगालमधील त्याच्या सर्व हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्यांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचाही निर्णय त्याने घेतला आहे. एवढेच नव्हे, तर येथे उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांचा पगारही रोनाल्डो स्वतःच्या खिशातून करणार आहे.