साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटनमध्ये रंगला आहे. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला आहे. आज तिसऱ्या दिवशी भारताच्या एकाही फलंदाजाला न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा धैर्याने सामना करता आला नाही. काइल जेमिसनने ५ गडी बाद करत भारताच्या डावाला खिंडार पाडले.
पावसामुळे सामन्याचा पहिला दिवस वाया गेला. तेव्हा दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. ६१ धावांवर भारताला रोहितच्या रुपाने पहिला धक्का बसला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसनने रोहितला (३४) बाद केले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या साऊदीने रोहितचा झेल टिपला. रोहित बाद झाल्यानंतर एका धावेच्या फरकाने शुबमन माघारी परतला. नील वॅग्नरने शुबमनला वॉटलिंगकरवी झेलबाद केले. शुबमनने २८ धावा केल्या. या दोघानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सांभाळायचा प्रयत्न केला, पण उपाहारानंतर चेतेश्वर पुजारा (८) बोल्टचा शिकार ठरला.
पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताला शंभरीपार नेले. तिसऱ्या सत्रात काही वेळ अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात. काही वेळानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. दरम्यान विराट आणि अजिंक्यने भारतासाठी अर्धशतकी भागिदारी केली. काही षटके खेळल्यानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. यानंतर खेळ होणार नसल्याचे पंचानी जाहीर केले. दुसऱ्या दिवशी विराट कोहली ४४ तर अजिंक्य २९ धावांवर नाबाद राहिले होते.
तिसऱ्या दिवशी पावसामुळे सामन्याला उशिरा सुरूवात झाली. तेव्हा जेमिसनने विराट (४४) पायचित करत भारताला अडचणीत आणले. त्यापाठोपाठ ऋषभ पंत अवघ्या चार धावा काढून बाद झाला. जेमिसनने त्याला लॉथमकडे झेल देण्यास भाग पाडलं. यानंतर वॅग्नरने अजिंक्य रहाणेला चकवलं. ४९ धावांवर त्याचा झेल लॉथमने टिपला. रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय डावाला गळती लागली. अश्विन (२२), इशांत शर्मा (४), बुमराह (०) आणि जडेजा (१५) ठराविक अंतराने बाद झाले. भारताचा संपूर्ण संघ २१७ धावांवर गारद झाला. जेमिसनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर बोल्ट आणि वॅग्नरने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. साउथीला एकमात्र गडी बाद करता आला.