मुंबई : 13 मार्च रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने दिल्ली कॅपिटल्ससमोर 151 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 2 चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखून विजय मिळवला. या सोबतच स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या संघाला स्पर्धेत सलग पाचव्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दिल्लीचा आरसीबीविरुद्ध दुसरा विजय : 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने सलामीवीर शेफाली वर्माच्या रूपाने पहिली विकेट गमावली. षटकातील दुसऱ्या चेंडूचा सामना करताना शेफाली आक्रमक शॉट खेळण्याच्या नादात आउट झाली. यानंतर एलिस कॅप्सीने 24 चेंडूंचा सामना करत 8 चौकारांच्या मदतीने 38 धावांची खेळी केली. तर जेमिमा रॉड्रिग्जने 28 चेंडूत 32 धावा केल्या. कर्णधार मेग लॅनिंगनेही 15 धावांची खेळी खेळली. दिल्ली संघाचा स्पर्धेतील हा चौथा विजय आहे. याशिवाय दिल्लीने आरसीबीविरुद्ध दुसरा विजय नोंदवला आहे. तत्पूर्वी, दिल्ली संघाने ब्रेबॉर्न स्टेडियमवर आरसीबीविरुद्धचा सामना ६० धावांनी जिंकला होता.
स्मृती मानधना पुन्हा अपयशी : आरसीबी संघाला स्पर्धेत आत्तापर्यंत विजयाचे खाते उघडता आलेले नाही. कर्णधार स्मृती मानधना या सामन्यातही पुन्हा एकदा अपयशी ठरली. ती 15 चेंडूत 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर सोफी डिव्हाईननेही 19 चेंडूत 21 धावा करत स्वस्तात आपली विकेट गमावली. या दोघींना शिखा पांडेने बाद केले. यानंतर हीदर नाइटही १२ चेंडूत ११ धावा करून तारा नॉरिसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. 3 विकेट्स गमावल्यानंतर पेरी आणि रिचा यांनी संघाचा डाव सांभाळला. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 34 चेंडूत 74 धावांची भागीदारी केली. रिचाला शिखाने यष्टिरक्षक तानिया भाटियाच्या हाताने झेलबाद केले. पेरीने 67 धावांची नाबाद खेळी खेळली. दिल्लीकडून शिखाला तीन आणि नॉरिसला एक बळी मिळाला.