बंगळुरू (कर्नाटक) Cricket World Cup २०२३ : गुरुवारी दुपारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताचा सामना नसताना देखील क्रिकेटप्रेमींनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. बंगळुरुकरांचं प्रेम भारताच्या सामन्याप्रमानंच न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात दिसून आलं. ICC क्रिकेट विश्वचषकाचा न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडनं 5 गडी राखून श्रीलंकेचा दणदणीत पराभव केलाय.
भारताचा सामना नसतानाही बंगळुरुकरांनी चिन्नास्वामी स्टेडियमच्या सर्व गेट्ससमोर एकच गर्दी केली. आपल्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर रांगा लावल्याचं दिसून आलं. मी न्यूझीलंडमध्ये सहा वर्षे वास्तव्यास होता. न्यूझीलंडमध्ये क्रीडा संस्कृती चांगली आहे. त्यामुळं मी श्रीलंकेविरुद्ध होत असलेल्या सामन्यात न्यूझीलंडला पाठिंबा देण्यासाठी आल्याचं क्रिकेटप्रेमी रोहितनं 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं.
न्यूझीलंड संघानं विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र व्हावं, तसंच भारताविरुद्ध न्यूझीलंड संघानं अहमदाबादेत सामना खेळावा, अशी इच्छा असल्याचं रोहित म्हणाला. न्यूझीलंड संघानं विश्वचषकाची प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकल्यास आनंदच होणार असल्याचं मत देखील रोहितनं व्यक्त केलंय.
न्यूझीलंडचा संघ चांगला असल्यामुळं मी त्यांना पाठिंबा देत आहे, असं तेथील क्रिकेटप्रेमी समीर नारायण म्हणाला. मार्की टूर्नामेंटमध्ये मला केन विल्यमसन, रचिन रवींद्र खूप आवडतात, म्हणून मी त्यांना पाठिंबा देत आहे, असं समीरनं म्हटलंय. तो सामन्यात देखील न्यूझीलंड संघाचा टी-शर्ट हवेत मुक्तपणे फडकवत होता.
स्टेडियमच्या बाहेर रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या नावाचे टी-शर्ट खरेदीसाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. स्थानिक मुलांनी रोहित शर्मा, विराट कोहलीच्या नावाचे टी-शर्ट विक्रीसाठी आणले होते. त्यामुळं त्यांचा देखील फायदा झाला. नाव न सांगण्याच्या अटीवर एका विक्रेत्यानं सांगितलं, रोहित तसंच विराटचे टी-शर्ट प्रत्येकी 250 रुपयांना विक्री होत आहेत. चाहत्यांनी उत्साहानं दोन्ही खेळाडूंचे टी-शर्ट विकत घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
तसंच बरेच क्रिकेट चाहते न्यूझीलंडचा टी-शर्ट घालून संघाला पाठिंबा देताना दिसले. भारतीय वंशाचा अष्टपैलू खेळाडू रचिन गोलंदाजी करायला आला, तेव्हा काही चाहते रचिनच्या नावाचा जयजयकार करताना पहायला मिळाले. न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका सामना पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींची गर्दी ओसांडून वाहत होती. न्यूझीलंडनं देखील प्रेकषकाच्या आशा पल्लवीत करत श्रीलंकेवर विजय मिळवला आहे.
बंगळुरूच्या क्रिकेटप्रेमींनी ट्रेंट बोल्ट, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर तसंच लॉकी फर्ग्युसन यांच्या गोलंदाजीचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी अनेक चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या खेळाडूची झलक आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे.
हेही वाचा -
- Cricket World Cup 2023 NZ vs SL : न्यूझीलंडचा श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय, न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या जवळ
- Cricket World Cup 2023 NZ vs SL : सामना न्यूझीलंड-श्रीलंकेचा, मात्र पाऊस ठरु शकतो पाकिस्तानसाठी 'तारणहार', नेमकं समीकरण काय?
- Cricket World Cup 2023 : इंग्लंडचा नेदरलॅंडवर मोठा विजय, बेन स्टोक्सचं शानदार शतक