सेंट जॉर्जेस (ग्रेनाडा) - दक्षिण आफ्रिका आणि यजमान वेस्ट इंडिज संघात टी-२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी रात्री पार पडला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १६७ धावा केल्या. प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजाने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला. तरी देखील आफ्रिकेने विंडिजचा अवघ्या एका धावेने पराभव केला. तबरेज शम्सी सामन्याचा हिरो ठरला. या विजयासह आफ्रिकेने पाच सामन्याच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.
यजमान वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा आफ्रिकेच्या सलामीवीर जोडीने ४२ धावांची सलामी दिली. रीजा हेनड्रिंक्स बाद झाल्यानंतर कर्णधार टेम्बा बावुवा देखील बाद झाला. तेव्हा क्विंटन डी कॉकने एक बाजू लावून धरत ७२ धावांची खेळी केली. मधल्या फळीतील फलंदाज वॅन डर डुसेन याने ३२ तर मार्करम याने २३ धावांचे योगदान दिले. आफ्रिकेच्या संघाने २० षटकात ८ बाद १६७ धावा धावफलकावर लावल्या. विंडीजकडून ओबेड मॅकॉय याने सर्वाधिक ४ तर ड्वेन ब्रोव्होने ३ गडी बाद केले.
वेस्ट इंडिज समोर विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर एविन लुईस (२७) आणि लेंडल सिमन्स (२२) यांनी विंडिजला चांगली सुरूवात दिली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. जॉर्ज लिंडे याने सिमन्सला माघारी धाडत आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर तबरेज शम्सीने एविन लुईसला बाद केले. जेसन होल्डर (१६), शिमरोन हेटमायर (१७) या जोडीने फटकेबाजी केली. पण ९० ते ९७ धावांच्या अंतरात एनगिडीने होल्डरला तर शम्सीने हेटमायरला बाद केले.
आंद्रे रसेलची फटकेबाजी
कर्णधार केरॉन पोलार्ड अवघ्या एका धावेवर कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण निकोलस पूरन आणि आंद्रे रसेल या जोडीने फटकेबाजी करत वेगाने धावा जमवण्यास सुरूवात केली. रसेलने १६ चेंडूत ३ षटकारासह झटपट २५ धावांची खेळी साकारली. रसेल बाद झाल्यानंतर फॅबियन एॅलिन आणि पूरनची जोडी मैमदानात होती. आफ्रिकेच्या गोलंदाजांची टिच्चून मारा केल्याने सामना अखेरच्या षटकापर्यंत पोहोचला. वेस्ट इंडीजचे ३ गडी शिल्लक होते. तेव्हा त्यांना अखेरच्या ६ चेंडूत १५ धावांची गरज होती.
अखेरच्या ६ चेंडूचा थरार
आफ्रिकेकडून अखेरचे षटक कागिसो रबाडा याने फेकले. पहिला चेंडू वाईड गेला. त्यानंतर त्याने पुढील चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवर एलेन याने शॉट फाइन लेगच्या दिशेने चौकार खेचला. चार चेंडूत विजयासाठी १० धावांची गरज होती. रबाडाने तेव्हा पुढील चेंडू परफेक्ट यॉर्कर फेकला. यावर एलेनला धाव घेता आली नाही. चौथ्या चेंडूवर दोन धावा मिळाल्या. रबाडाने पाचवा चेंडू देखील परफेक्ट यॉर्कर फेकला. हा चेंडू देखील निर्धाव राहिला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ८ धावांची गरज होती. तेव्हा रबाडाने एलेनला फुलटॉस चेंडू फेकला त्यावर एलेनने षटकार ठोकला. परंतु, षटकार ठोकून देखील दुर्दैवीरित्या विंडीजचा एका धावेने पराभव झाला.
हेही वाचा - आदिती अशोक ठरली Tokyo Olympics साठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू
हेही वाचा - 'खेलरत्न'साठी BCCI करणार मिताली राज, रविचंद्रन अश्विनच्या नावाची शिफारस