मुंबई - वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अचानक स्थगित करण्यात आला आहे. वेस्ट इंडिज स्टाफमधील एक सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तेव्हा नाणेफेक झाल्यानंतर हा सामना स्थगित करण्यात आला.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना, वेस्ट इंडिज स्टाफमधील सदस्य कोरोनाबाधित आढळल्याने स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. उभय संघातील हा सामना केंसिग्टन येथे खेळला जाणार होता.
कोरोना प्रोटोकॉलनुसार, दोन्ही संघातील सदस्य आणि सामना अधिकारींनी तात्काळ हॉटेल गाठले. सामना अचानक स्थगित करण्यात आल्याने क्रीडा चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
कधी खेळला जाणार दुसरा एकदिवसीय सामना?
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व सदस्य, खेळाडू तसेच सामना आधिकारी यांची पुन्हा कोरोना चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना कधी खेळवला जावा, याचा निर्णय घेतला जाणार आहे. यादरम्यान सर्व खेळाडूंना हॉटेलमध्ये क्वारंटाइनमध्ये व्हावे लागणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल लवकरच येण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
ऑस्ट्रेलिया मालिकेत आघाडीवर
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवली जात आहे. उभय संघातील या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 133 धावांनी जिंकला होता.
हेही वाचा - मी पण ब्राम्हण आहे, असे सांगून सुरेश रैना फसला; सोशल मीडियावर होतोय ट्रोल
हेही वाचा - 'राहुल द्रविड फक्त इंदिरानगरचा गुंडा नाही तर तो संपूर्ण भारताचा गुंडा'