नवी दिल्ली : भारताचा करिष्माई फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात 186 धावांची शानदार खेळी खेळून त्याच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच या खेळीने त्याने त्याच्या भविष्याचे संकेतही दिले.
3 वर्षांनंतर झळकावले शतक : टी - 20 आणि वनडेमध्ये शतक झळकावल्यानंतरही तो बराच काळ कसोटी सामन्यात शतकासाठी झगडत होता. कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यासाठी कोहलीला 1205 दिवस वाट पाहावी लागली. कोहलीच्या या खेळीने टीम इंडियाने केवळ कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले नाही तर पहिल्या डावात आघाडी घेत ऑस्ट्रेलियाला संदेश दिला की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंची बॅट जोरात बोलणार आहे.
शतकांच्या शतकाकडे वाटचाल : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोहलीचे हे शतक तब्बल 41 कसोटी डावांच्या अंतरानंतर आले आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात कोहलीने शेवटचे शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावल्यानंतर कोहली एकप्रकारे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आणखी मजबूत इराद्याने प्रवेश करेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या मोसमात खेळलेली त्याची ही 11 वी सर्वात मोठी खेळी आहे. विराटचे हे केवळ 28 वे कसोटी शतकच नाही तर हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील एकूण 75 वे शतक ठरले आहे. आता तो हळूहळू शतकांचे शतक पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तो आता त्याच्या अर्धशतकांचे शतकात रूपांतर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
फिरकी गोलंदाजीचा शांततेने सामना केला : आपल्या या खेळीदरम्यान कोहलीने नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन यांच्या फिरकी गोलंदाजीचा मोठ्या शांततेने सामना केला. त्याने या संथ खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फिरकी त्रिकुटा विरुद्ध फलंदाजी करताना 4 मोठ्या भागीदारी करून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. कोहलीने गिलसोबत 58 धावा, जडेजासोबत 64 धावा, भरतसोबत 84 धावा आणि अक्षर पटेलसोबत 162 धावांची भागीदारी करत टीम इंडियाच्या डावाला मजबूती दिली तसेच टीकाकारांनाही संदेश दिला की तो आजही मोठा डाव आणि दीर्घ भागीदारी करू शकतो.