मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स येथे रंगला आहे. भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलच्या शानदार शतकाच्या जोरावर 364 धावा केल्या आहेत. इंग्लंडने ही भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. परंतु या सामन्यात प्रेक्षकांनी के एल राहुलच्या अंगावर थॅम्पेन बाटलीचे कॉर्क म्हणजे बाटलीचे झाकण फेकल्याचे समोर आलं आहे.
इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना ही घटना घडली. के राहुल सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. तेव्हा काही उपद्रवी प्रेक्षकांनी के एल राहुलच्या अंगावर थॅम्पेन बाटलीचे कॉर्क फेकले. प्रेक्षकांचे असभ्य वर्तन पाहून विराट कोहली के एल राहुलजवळ पोहोचला. त्याने रागात राहुलला ते कॉर्क प्रेक्षकांच्या दिशेने फेकण्यास सांगितले.
विराटचा स्पष्ट आवाज येत नव्हता. पण त्याचे इशारे पाहता तो राहुलला ते कॉर्क प्रेक्षकांकडे फेकण्यास सांगत होता. दरम्यान, प्रेक्षकांनी केलेले हे असभ्य वर्तन भारतीय चाहत्यांना आवडले नाही. याविषयी भारतीय चाहते सोशल मीडियावर कडवी प्रतिक्रिया देत आहेत.
के एल राहुलचे शानदार शतक -
के एल राहुल इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मासोबत सलामीला उतरला होता. राहुल-रोहित जोडीने भारताला 126 धावांची सलामी दिली. रोहित बाद झाल्यानंतर राहुलने एक बाजू लावून धरत शतक झळकावले. त्याने 250 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकारासह 129 धावा केल्या. रॉबिन्सनने राहुलची खेळी संपुष्टात आणली. त्याने राहुलला सिब्लीकडे झेल देण्यास भाग पाडले. राहुल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि रविंद्र जोडीने भारताला तीनशेचा टप्पा पार करून दिला.
हेही वाचा - T20 WC 2021: ICCची मोठी घोषणा, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ इतकेच खेळाडू घेऊ जाऊ शकतील
हेही वाचा -ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी IPLच्या उर्वरित हंगामात का खेळलं पाहिजे, रिकी पाँटिगने सांगितलं कारण