मुंबई - भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची 21व्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. एका क्रीडा माध्यमाच्या पोलमध्ये सचिन तेंडुलकरने 21व्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या शर्यतीत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराला मात दिली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ऐतिहासिक सामन्याच्या निमित्ताने एका क्रीडा माध्यमाने 21व्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाची निवड करण्यासाठी पोल घेतला. यासाठी कॉमेन्ट्री पॅनलमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण आणि आकाश चोप्रा सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. कॉमेन्ट्री पॅनलमधील खेळाडू आणि फॅन्सनी सचिनला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडले.
याविषयी सुनील गावसकर म्हणाले, हा निर्णय खूपच कठीण होता. सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यात काट्याची टक्कर बघायला मिळाली. पण माझा साथीदार मुंबईकर सचिन तेंडुलकर 21व्या शतकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
सचिनने वयाच्या 16व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 15 हजार 921 धावा फटकावल्या आहेत. यात 51 शतकांचा समावेश आहे. संगकाराने कसोटीत 12 हजार 400 धावा केल्या असून यात 38 शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने 18 हजार 426 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावे 49 शतकं आहेत.
हेही वाचा - WTC Final : ...तर सामना संपला समजा, वॉर्नची न्यूझीलंडला चेतावणी
हेही वाचा - ENGW vs INDW: स्नेह राणाने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी भारताची पहिलीच खेळाडू