दुबई - दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाने सांगितलं की, आगामी टी-20 विश्वकरंडक आफ्रिका टीम आणि देशासाठी महत्वपूर्ण आहे. दरम्यान, टी-20 विश्व करंडक असो की एकदिवसीय विश्वकरंडक असो, आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अंतिम फेरी गाठता आलेली नाही.
बावुमा आयसीसी क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना म्हणाला की, 2021 आयसीसी टी-20 विश्वकरंडक आमच्या संघासाठी आणि देशासाठी खूप महत्वपूर्ण आहे. आम्हाला पहिल्यांदा आयसीसी टी-20 विश्व करंडक जिंकण्याची देखील संधी असेल.
दरम्यान, आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा समावेश ग्रुप अ मध्ये आहे. या गटात गतविजेता वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पात्रता फेरीतून आलेले दोन अव्वल संघ यांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आतापर्यंत आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आलेली नाही. संपूर्ण स्पर्धेत ते चांगला खेळ करतात. पण मोक्याच्या सामन्यात त्यांचा पराभव होतो. यामुळे त्यांना चोकर्स देखील म्हटलं जातं.
टेम्बा बावुमा म्हणाला की, आमच्या संघाचा ज्या गटात सामावेश आहे, त्या गटात रोमांच आहे. आम्ही सर्व संघाशी सामना करण्याची तयारी करत आहोत. कारण आम्ही फायनल किंवा अंतिम चॅम्पियनशीप पर्यंत पोहोचण्यासाठीचे मिशन जाणतो.
दक्षिण आफ्रिकेने या वर्षाच्या सुरूवातीला पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी टी-20 मालिका 2-1 ने गमावली. यानंतर मायदेशात त्यांचा पाकिस्तानने 3-1 ने पराभव केला. पण जून आणि जुलै महिन्यात झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत त्यांनी 3-2 ने विजय मिळवला. यानंतर त्यांनी आर्यलंडचा 3-0 ने पराभव केला होता.
दक्षिण आफ्रिकेचा संघ आता सप्टेंबर महिन्यात श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्याची टी-20 मालिका खेळणार आहे. दरम्यान, आफ्रिकेचा संघ टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत आपल्या अभियानाला 23 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करेल. उभय संघातील हा सामना अबुधाबी येथे होणार आहे.
हेही वाचा - महिला वेगवान गोलंदाज मेगन शटच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म
हेही वाचा - हार्दिक पांड्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी हळूहळू तयार होतोय - म्हाम्ब्रे