दुबई - यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून होणाऱ्या टी-20 विश्व करंडक स्पर्धेआधी प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आली आहे. या स्पर्धेच्या दरम्यान स्टेडियममधील क्षमतेच्या 70 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. आयसीसी आणि या स्पर्धेचे यजमान असलेल्या बीसीसीआयला यूएई सरकारने ही परवानगी दिली. दरम्यान, ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात पार पडणार आहे.
आयसीसीचे सीईओ जेफ अलार्डिस यांनी एक प्रसिद्ध जारी केले आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही ओमान आणि यूएईमध्ये क्रिकेट चाहत्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत.'
क्रिकेट चाहत्यांना टी-20 विश्व करंडक पाहण्याची संधी मिळणार आहे. आमचे यजमान बीसीसीआय, अमिरात क्रिकेट बोर्ड आणि ओमान क्रिकेट यांच्यासह स्थानिक सरकारचे आभार. त्यांनी चाहत्यांना सुरक्षित वातावरणात क्रिकेट पाहता येईल, याची व्यवस्था केली आहे, असे देखील जेफ अलार्डिस म्हणाले.
यूएई आणि ओमान या देशांमध्ये आजवरच्या सर्वात मोठ्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 16 देशांच्या चाहत्यांनी याचा आनंद घ्यावा, अशी आमची इच्छा असल्याचे देखील अलार्डिस म्हणाले.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धा सर्वांसाठी सुरक्षित वातावरणामध्ये पार पाडावी यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत. मागील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला 5 वर्षे झाली आहेत. आम्ही जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंची आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ खेळ पाहण्यास उत्सुक आहोत, असेही अलार्डिस यांनी सांगितलं.
दरम्यान, टी20 विश्वकरंडक स्पर्धेला 17 ऑक्टोबर रोजी ओमान विरुद्ध पापूआ न्यू गिनी यांच्यातील सामन्याने सुरूवात होणार आहे. त्याच दिवशी बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यातील सामना देखील होणार आहे. सुपर 12 स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी होईल. तर भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
हेही वाचा - RCB VS PBKS : पंजाबचा फाडशा पाडत बंगळुरू प्ले ऑफ फेरीत
हेही वाचा - KKR VS SRH : कोलकाताचा हैदराबादवर सहा गडी राखून विजय