कराची - पाकिस्तान सुपर लीगशी (पीएसएल) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. पीएसएल दरम्यान कोरोना विषाणूच्या चाचणीत ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर फवाद अहमद पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या तो क्वारंटाइन कालावधीत आहे.
पीएसएलमध्ये फवाद हा इस्लामाबाद युनायटेडच्या संघाचा भाग आहे. फवादच्या चाचणीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) म्हटले आहे की, इस्लामाबाद युनायटेडचा उर्वरित संघ चाचणीत निगेटिव्ह आला. २०१६ आणि २०१८मध्ये पीएसएलचे विजेतेपद जिंकलेल्या इस्लामाबाद युनायटेडचा पुढील सामना सोमवारी क्वेटा ग्लेडिएटर्सविरुध्द खेळला जाणार होता. परंतु पीसीबीच्या विधानानंतर हा सामना दोन तास उशीरा खेळवला गेला.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोरोना संसर्गाची ही पहिली घटना आहे. ३९ वर्षीय फवादला लीगमध्ये आतापर्यंत एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. पेशावर झल्मीविरुद्ध त्याने ४० धावांत एक गडी बाद केला.
मूळचा पाकिस्तानी असलेल्या फवादने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून तीन एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने दोन्ही स्वरूपात तीन गडी बाद केले. २०१३मध्ये तो अखेरचा राष्ट्रीय संघात खेळताना दिसला होता, तेव्हापासून तो संघातून बाहेर होता. २०१९ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
हेही वाचा - भारताचा लाडका क्रिकेटपटू बनला 'हिरो'....पाहा व्हिडिओ