अॅमस्टरडॅम : टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. मात्र, या इनिंगची सुरुवात त्याने क्रिकेटच्या मैदानावर नाही तर स्वयंपाकघरातून केली आहे. सुरेश रैना आता फूड इंडस्ट्रीच्या क्षेत्रात उतरला आहे. नेदरलॅंडच्या अॅमस्टरडॅममध्ये त्याने एक भारतीय रेस्टॉरंट उघडले आहे. याद्वारे तो युरोपातील लोकांना भारतीय जेवणाची चव चाखण्यासाठी देणार आहे. त्याने या रेस्टॉरंटला 'RAINA' असे नाव दिले आहे. यासोबतच त्याने त्याच्या नवीन रेस्टॉरंटचे काही फोटोही शेअर केले आहेत.
सोशल मीडियावरून दिली माहिती : सुरेश रैनाने त्याच्या सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. रैनाने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'पूर्वी कधीही न पाहिलेल्या चविष्ट जेवणासाठी सज्ज व्हा! अॅमस्टरडॅममधील 'रैना इंडियन रेस्टॉरंट'ची ओळख करून देताना मी खूप आनंदी आहे. वर्षानुवर्षे, तुम्ही माझे खाद्यपदार्थावरील प्रेम पाहिले आहे. आता मी भारताच्या विविध भागांतील सर्वात अस्सल चव थेट युरोपपर्यंत पोहोचवणार आहे. उत्तर भारतातील समृद्ध मसाल्यापासून ते दक्षिण भारतातील सुगंधी करीपर्यंत, रैना इंडियन रेस्टॉरंट देशाच्या वैविध्यपूर्ण पाककला सेलिब्रेट करणार आहे! प्रेमाने, अचूकतेने आणि माझ्या वैयक्तिक स्पर्शाने तयार केलेल्या भारतीय पाककृतीचे वैविध्य दाखवण्यात आम्हांला खूप अभिमान वाटतो आहे.'
सुरेश रैना स्वत: स्वयंपाक करताना दिसला : रैनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो त्याच्या रेस्टॉरंटमध्ये स्वत: स्वयंपाक करताना दिसत आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, 'गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही माझे खाद्यपदार्थ आणि माझ्या स्वयंपाकासंबंधी पोस्ट पाहिल्या आहेत. आता या विलक्षण प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा. आम्ही एकत्र एका चवदार प्रवासाला सुरुवात करत आहोत. आमच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या डिशेसना पाहण्यासाठी आणि @rainaamsterdam च्या भव्य अनावरणासाठी संपर्कात रहा!'
हेही वाचा :
- Virat Kohli Net Worth: विराट कोहलीची वर्षभरात १ हजार कोटींहून अधिक कमाई, उत्पन्नाचे साधन जाणून व्हाल थक्क
- Rohit Sharma : पत्नी रितिकासाठी रोहित शर्माने चक्क समुद्रात मारली उडी!, जाणून घ्या कारण..
- India Tour Of West Indies : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ; पुजाराला डच्चू, अजिंक्य रहाणे उपकर्णधार