मेलबर्न - भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या मालिकेतील नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे आयोजन क्वींसलँड येथे करण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेने भारतीय संघ या दौऱ्याची सुरूवात करणार होता. उभय संघातील या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार होती. परंतु आता ही मालिका दोन दिवस उशिरा सुरूवात होणार आहे. म्हणजे 19 ऐवजी 21 सप्टेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरूवात करेल.
भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन एकदिवसीय, एक डे नाईट कसोटी सामना आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या एका रिपोर्टनुसार, उभय संघातील पहिला एकदिवसीय सामना ओव्हलमध्ये होणार होता. परंतु आता कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हा सामना मॅके येथे होणार आहे.
रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनामुळे पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यामुळे भारतीय संघाच्या दौऱ्यातील वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भारतीय महिला संघ या दौऱ्यासाठी बंगळुरूहून रवाना होणार आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय संघाला पुढील दोन आठवडे क्वारंटाइन राहावे लागेल. त्यानंतर उभय संघातील मालिकेला सुरूवात होणार आहे. दरम्यान, क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर भारतीय संघाला सरावासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्याप याविषयीची परवानगी देण्यात आलेली नाही.
हेही वाचा - सुर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान द्या, दिलीप वेंगसकरचा सल्ला
हेही वाचा - IND VS ENG: रविंद्र जडेजाला दुखापत, भारतीय संघाच्या अडचणीत वाढ