नवी दिल्ली - वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारी शेफाली वर्मा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. हरियाणा बोर्डाने घेतलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून शेफालीने 52 टक्के गुण मिळवले आहेत. शेफालीचे वडील संजीव वर्मा यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या मार्च शेफालीने महिन्यात 10वी ची परीक्षा दिली होती. दहावीच्या परीक्षेत शेफालीने 52 टक्के गुण मिळवल्याने कुटुंबीय आनंदात आहेत. तर हरयाणा बोर्डाचे चेअरमन जगबीर सिंह यांनी सुद्धा शेफालीला यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
शेफाली सध्या भारतीय महिला संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाने ७ वर्षानंतर पहिला कसोटी सामना खेळला. आतापर्यंत या दौऱ्यात भारताने एक कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली आहे. कसोटीत पदार्पण करताना शेफालीने चांगली कामगिरी केली. यामुळे शेफालीचा प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of the Month) मध्ये समावेश करण्यात आला आहे.
शेफाली ही मूळची हरियाणाची आहे. शेफालीने अवघ्या 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकलं. तिच्या खेळाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील 'फॅन' आहेत. शेफालीच्या वडिलांनाही क्रिकेटचे वेड आहे. त्यांनी तिला मुलांच्या अकॅडमीत सरावासाठी टाकलं, तेव्हा आसपासच्या लोकांनी त्यांना टोमणे मारणे सुरू केले. ती मुलगी आहे तिला बाहेर पाठवू नका, असे सल्लेही दिले. मात्र, शेफालीच्या वडिलांनी तिची आवड जपली आणि शेफालीनं आपल्या मेहनतीचं सोनं करून दाखवलं. तिची अवघ्या 15व्या वर्षी भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड करण्यात आली. भारतीय संघात स्थान मिळेपर्यंत शेफालीचा प्रवास सहज नव्हता. या काळात अनेक गोष्टींना तिला तोंड द्यावे लागले.
शेफालीने सचिन तेंडुलकरचा मोडला आहे विक्रम -
–15 वर्षीय शेफालीने 9 नोव्हेंबर 2019ला वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती. हे तिचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक होते. त्यामुळे ती भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली होती. हा विक्रम करताना तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा 30 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. शेफालीने हा विक्रम केला, तेव्हा तिचे वय 15 वर्षे 285 दिवस इतके होते. तर, 30 वर्षांपूर्वी 16 वर्षे 214 दिवस एवढे वय असताना सचिनने 24 ऑक्टोबर 1989ला पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे पहिले अर्धशतक केले होते.
हेही वाचा - भारतीय महिला संघात शफाली वर्मा ठरु शकते गेम चेंजर
हेही वाचा - सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणारी सर्वात तरुण भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? जाणून घ्या