कोलकाता Afghanistan T 20 : टीम इंडियाचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी, ते टी 20 क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याची पुष्टी केली आहे. यानंतर आता 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी त्यांचं भारतीय संघात पुनरागमन होऊ शकतं. अशा परिस्थितीत, प्रदीर्घ विश्रांतीनंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाचं नेतृत्व करू शकतो. कारण कर्णधारपदाचे दोन्ही दावेदार, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. हे दोघंही अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेत खेळणार नाहीत.
रोहित-विराटला संधी मिळेल का : रोहित शर्मा आणि विराट कोहली नोव्हेंबर 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा टी 20 सामना खेळले होते. मात्र आता जूनमध्ये खेळल्या जाणार्या टी 20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, निवडकर्ते या दोन्ही दिग्गजांना घरच्या मैदानावर त्यांच्या कौशल्यांना अधिक धार देण्यासाठी टीममध्ये संधी देऊ शकतात. बीसीसीआयच्या एका सूत्रानं शुक्रवारी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं, "संघाचं नेतृत्व कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु रोहित आणि विराट या दोघांनीही, ते भारतासाठी टी 20 खेळणार असल्याची पुष्टी केली आहे."
ऑनलाइन बैठक होणार : संघ निवडीसाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह पाच निवडकर्ते ऑनलाइन सामील होणार असून, या बैठकीत कर्णधारपदाचा प्रश्न सोडवला जाईल. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, सलील अंकोला आणि शिव सुंदर दास हे दक्षिण आफ्रिकेत असून, इतर दोन निवडकर्ते, सुब्रत बॅनर्जी आणि एस शरथ भारतात आहेत.
नेतृत्व कोण करणार : मुंबई इंडियन्सनं कर्णधारपदावरून काढलं असलं तरी, रोहित शर्मा छोट्या आवृत्तीत भारताचं नेतृत्व करू शकतो. परंतु इतर नावं देखील रिंगणात आहेत. "राहुल द्रविडला काय हवं हे कोणालाच माहीत नाही. निवडकर्त्यांचं आणि प्रशिक्षकांचं मत असेल की युवा खेळाडूंनं संघाचं नेतृत्व करावं, तर तसंही घडू शकतं. तेव्हा हॉट सीटसाठी रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर यांच्या नावांचाही विचार केला जाऊ शकतो", असं सूत्रानं सांगितलं. कर्णधारपदासाठी शुभमन गिल सारख्या तरुणाचाही विचार केला जाऊ शकतो, परंतु ही शक्यता फार कमी आहे.
हे वाचलंत का :