लाहोर - इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या विषयावरून आपला पुरूष आणि महिला क्रिकेटचा संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. याविषयावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यानी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, इंग्लंडच्या आधी न्यूझीलंडने सामना सुरू होण्याच्या काही तास आधी सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता.
पीसीबीने आज मंगळवारी एक व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ रमीज राजा यांचा असून ते यात म्हणतात की, मी इंग्लंडने माघार घेतल्याने निराश आहे. पण पश्चिम देश एकजूट होऊन एकमेकांचे समर्थन करतील, अशी मला आशा होती. तुम्ही सुरक्षेचे कारण देत काहीही निर्णय घेऊ शकता. न्यूझीलंडने धोक्याची माहिती न देताच मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता इंग्लंडने देखील हेच केलं.
आमच्यासाठी हा एक धडा आहे. आम्ही या देशांचा दौरा करतो. आम्हाला कठोर क्वारंटाइनमधून जावं लागतं. तरीदेखील आम्ही त्यांची नियमावली पाळतो. पण यात एक धडा आहे. आता आम्ही आमचे हित पाहून पुढील पावले टाकू, असे देखील रमीज राजा यांनी सांगितलं.
पीसीबी हा गॅप भरण्यासाठी झिम्बाब्बे, श्रीलंका आणि बांगलादेशसोबत चर्चा करत आहे. परंतु यात लॉजिस्टिक समस्या येत आहेत.
रमीज राजा पुढे म्हणाले की, आम्ही टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होऊ. यात आमच्या टारगेटवर भारताशिवाय न्यूझीलंड आणि इंग्लंडचा संघ असेल. आम्ही स्वत:ला आणखी बळकट करू. तसेच आम्ही जिंकण्याच्या इराद्यांने मैदानात उतरू. कारण आमच्यासोबत त्यांनी चांगला व्यवहार केला नाही. आम्ही याचा बदला मैदानात घेऊ.
हेही वाचा - Ind W Vs Aus W : ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिला संघाचा दारूण पराभव
हेही वाचा - INDW vs AUSW: 'रन मशीन' मिताली राजचा करिश्मा, महिला क्रिकेटमध्ये रचला आणखी एक विक्रम