कराची - ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन यांना आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. याशिवाय गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी वेर्नोन फिलँडर यांच्याकडे सोपण्यात आली आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन 17 ऑक्टोंबरपासून ओमान आणि यूएईमध्ये करण्यात आले आहे.
माजी कर्णधार रमीज राजा यांची सर्वानुमते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. यानंतर काही तासांतच मॅथ्यू हेडन आणि वेर्नोन फिलँडर यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे वृत्त समोर आले. दरम्यान, मॅथ्यू हेडन यांची गणना ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांमध्ये केली जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 103 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळली आहेत.
मॅथ्यू हेडन यांनी कसोटीत 30 शतक आणि 29 अर्धशतकासह 8 हजार 625 धावा केल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे 10 शतक आणि 36 अर्धशतकासह 6 हजार 133 धावा आहेत. यात त्यांचा स्ट्राईट रेट 78 पेक्षा जास्त आहे.
...म्हणून ऑस्ट्रेलियन खेळाडूचे असणे फायद्याचे
पीसीबीचे नूतन अध्यक्ष रमीज राजा म्हणाले की, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू संघात काही आक्रमकता आणू शकतो. मॅथ्यू हेडन यांच्याकडे विश्वकरंडक खेळण्याचा अनुभव आहे. ते विश्वस्तरीय खेळाडू आहेत. ड्रेसिंग रुममध्ये एक ऑस्ट्रेलियन खेळाडूचे असणे फायद्याचे ठरेल.
वर्नोन फिलँडरला मी चांगल्या पद्धतीने ओळखतो. तो गोलंदाजीतील बारकावे जाणतो. तसेच त्याची ऑस्ट्रेलियात चांगला रेकॉर्ड आहे, असे देखील रमीज राजा यांनी सांगितलं.
दरम्यान, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर मिसबाह उल हक आणि वकार युनूस यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
हेही वाचा - जसप्रीत बुमराहला मागे टाकत जो रूटने जिंकला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार
हेही वाचा - माजी क्रिकेटर रमीज राजा पीसीबीचे नवे अध्यक्ष, 3 वर्षे राहणार पदवर