दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स संघाचा 20 धावांनी पराभव केला. मुंबईच्या पराभवानंतर संघाचा कर्णधार केरॉन पोलार्डने प्रतिक्रिया दिली आहे.
सामना संपल्यानंतर पोलार्ड म्हणाला की, चेन्नईने 150 हून अधिक धावा केल्या. संघात फलंदाजांची चांगली फळी असून देखील आम्ही लक्ष्य गाठू शकलो नाही. सुरूवातीला तीन विकेट गमावणे आम्हाला महागात पडले. परंतु सौरभ तिवारीे चांगली फलंदाजी केली. पण सामना गमावणे निराशजनक आहे.
ऋतुराज गायकवाड याने चांगली फलंदाजी केली. टी-20 क्रिकेटमध्ये जर एखादा फलंदाज चांगली कामगिरी करतो तर त्याचा फटका विरोधी संघाला बसतोच. आम्ही गोलंदाजीची सुरूवात चांगली केली. परंतु शेवट चांगला करण्यात आम्ही अपयशी ठरलो. आम्ही अतिरिक्त 20 धावा दिल्या. खेळपट्टी गोलंदाजीसाठी चांगली होती. सुरूवातीला आम्ही विकेट देखील मिळवल्या. पण ही लय आम्ही कायम ठेऊ शकलो नाही, असे देखील केरॉन पोलार्ड म्हणाला.
दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 बाद 136 धावांपर्यंत मजल मारता आली. परिणामी चेन्नईने हा सामना 20 धावांनी जिंकला. या विजयासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला.
हेही वाचा - KKR vs RCB : आरसीबी आणि केकेआर यांच्यात आज होणार सामना
हेही वाचा - भारतीय खेळाडू 2021-22 मध्ये राहणार व्यस्त, 'हे' संघ करणार भारताचा दौरा