मुंबई - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा आज बुधवारी करण्यात आली आहे. यासोबत आणखी एक मोठी घोषणा बीसीसीआयने केली आहे. महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहे. तो मेंटॉर म्हणून म्हणून भारतीय संघासोबत असणार आहे, याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.
मुंबईत बीसीसीआयची पत्रकार परिषद पार पडली. यात बोलताना जय शाह म्हणाले की, मी महेंद्रसिंग धोनीसोबत संघाच्या मेंटॉर संदर्भात चर्चा केली आहे. तो ही जबाबदारी पार पडण्यासाठी तयार आहे. यामुळे तो टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघासोबत मेंटॉर म्हणून असणार आहे. याबाबत मी कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबतही बोललो आहे. त्यांनीही हा निर्णय पटलेला आहे.
दरम्यान, महेंद्रसिंग धोनी याने मागील वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो भारताचा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 मध्ये टी-20 विश्वकरंडक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. याशिवाय भारताने त्याच्या नेतृत्वात 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीला गवसणी घातली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे.
भारताच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या संघात फिरकीपटूंचाच भरणा जास्त आहे. भारताच्या संघात 4 फलंदाज, 2 यष्टिरक्षक-फलंदाज, 1 अष्टपैलू खेळाडू, 2 फिरकी अष्टपैलू, 3 फिरकीपटू व 3 वेगवान गोलंदाज आहेत.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू - शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कोणाला मिळाली संधी
हेही वाचा - Video : टीम इंडियाच्या ओवल कसोटीतील ऐतिहासिक विजयावर मोहम्मद कैफचा 'नागिन डान्स'