नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने महेंद्रसिंग धोनीबद्दल एक मनोरंजक तथ्य उघड केले आहे. तो म्हणाला की, जेवण्याच्या बाबतीत धोनी फारच विचित्र आहे. उथप्पा आणि धोनी दोन दशकांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांनी बराच वेळ एकत्र घालवलेला आहे. उथप्पाने 'माय टाइम माय हिरो' या कार्यक्रमात सांगितले की, 'धोनीचा साधेपणा ही अशी गोष्ट आहे जी कधीच बदललेली नाही. तो आजही पहिल्या भेटीत होता तसाच साधा आहे. तो जगातील सर्वात साधा माणूस आहे'.
कशी झाली धोनीशी पहिली भेट? : उथप्पाने 2003 मध्ये पहिल्यांदा धोनीला भेटल्याचा किस्सा शेअर केला. तो म्हणाला, 'मी पहिल्यांदा धोनीला 2003 मध्ये एनसीए बंगळुरू येथील भारतीय शिबिरात पाहिले. तो मुनाफ पटेलविरुद्ध फलंदाजी करत होता. धोनी तेव्हाही त्याला लांब लांब षटकार मारत होता. त्याने एस श्रीरामला जखमी केले होते. श्रीराम त्याला गोलंदाजी करत होता आणि धोनीने क्रीझच्या बाहेर येऊन चेंडू जोरात मारला. श्रीरामने चेंडूला हाताने स्पर्श केला तरीही चेंडू सुमारे 10 ते 20 यार्ड मागे गेला. यानंतर श्रीराम धावत थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. त्याला बोटाला दुखापत झाली होती. त्याचवेळी धोनी भारताकडून खेळणार हे मला माहीत होते. तो एक खास फलंदाज आहे'.
'धोनी चिकनशिवाय बटर चिकन खातो' : उथप्पाने सांगितले की, 'आम्ही नेहमी एकत्र खायचो. सुरेश रैना, इरफान पठाण, आरपी सिंग, पियुष चावला, मुनाफ पटेल, धोनी आणि मी असा आमचा ग्रुप होता. आम्ही दाल मखनी, बटर चिकन, जीरा आलू, कोबी आणि रोटी ऑर्डर करायचो. पण जेव्हा अन्नाचा प्रश्न येतो तेव्हा धोनी अतिशय कठोर व्यक्ती होता. तो बटर चिकन खायचा पण चिकनशिवाय, फक्त ग्रेव्हीसोबत! जेव्हा तो चिकन खायचा तेव्हा तो रोट्या खात नसे. जेव्हा जेवणाची गोष्ट येते तेव्हा तो फारच विचित्र आहे.
धोनी कर्णधार म्हणून यशस्वी का? : धोनीने भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये सीएसकेसाठी कर्णधार म्हणून अभूतपूर्व यश मिळवले आहे. उथप्पा याचे कारण स्पष्ट करताना म्हणतो की, 'तो अत्यंत चतूर आहे. तो त्याच्या या गुणाला बॅक करतो. त्यामुळेच तो इतका यशस्वी कर्णधार ठरला आहे. विजय असो वा पराभव, तो प्रत्येक निकालाची जबाबदारी घेतो. उथप्पा धोनीच्या इतर गुणांबद्दलही बोलला. त्याने काही वर्षांपूर्वी आयपीएल लिलावानंतर धोनीशी झालेले पहिले संभाषण शेअर केले.
जेव्हा धोनीने उथप्पाला कॉल केला : उथप्पा म्हणाला, 'धोनी खूप मोकळा व्यक्ती आहे. तुमचे मन दुखावले तरी खरे बोलायला तो मागेपुढे पाहत नाही. मला आठवते की, जेव्हा सीएसकेने मला लिलावात साइन केले. तेव्हा त्याने मला कॉल केला होता. तो म्हणाला की, मला खात्री नाही की तुला खेळण्याची संधी मिळेल की नाही. कारण सीझन खूप मोठा आहे. मी याबद्दल विचार केला नाही. जर तु खेळला तर मी तुला कळवीन. मी आयपीएलमध्ये 13 वर्षांपासून खेळतो आहे तरीही त्याने मला काय करायचे आहे ते माझ्यासमोर सांगितले. मला याचे अजूनही खूप कौतुक वाटते'.