रांची MS Dhoni Fraud : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. धोनीची ही फसवणूक त्याचा जवळचा मित्र आणि माजी बिझनेस पार्टनर मिहिर दिवाकर यानं केली. कॅप्टन कूलनं रांचीच्या दिवाणी न्यायालयात अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केलाय. धोनीनं त्याच्या माजी बिझनेस पार्टनरवर 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.
काय आहे प्रकरण : दिवाकरनं 2017 मध्ये धोनीसोबत जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी करार केला होता. यासाठी काही अटी आणि शर्तीही घालण्यात आल्या होत्या. परंतु, मिहिरनं या अटींचं पालन केलं नाही आणि नफ्यातला वाटाही दिला नाही. यामुळे धोनीचं 15 कोटींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतय. त्यानंतर त्याचे वकील दयानंद सिंह यांनी अर्का स्पोर्ट्सविरुद्ध 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल केला.
अनेक नोटीस पाठवल्या : केस दाखल करण्यापूर्वी धोनीनं 15 ऑगस्ट 2021 रोजी अर्का स्पोर्ट्सला नोटीस पाठवली होती. त्यानंतर अर्का स्पोर्ट्सला दिलेले अधिकार रद्द करण्यात आले. धोनीनं त्याच्या बिझनेस पार्टनर विरोधात अनेक नोटीसही पाठवल्या होत्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर आता त्याच्यावर खटला दाखल करण्यात आलाय.
ऋषभ पंतचीही करोडोंची फसवणूक : अव्वल क्रिकेटपटूंसोबत फसवणुकीचं हे प्रकरण नवीन नाही. अलीकडेच डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसोबत करोडोंची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. 2020-21 मध्ये मृणाल सिंग नावाच्या व्यक्तीनं पंतला स्वस्त दरात लक्झरी घड्याळं मिळवून देण्याचं आमिष दाखवून 1.63 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. पोलिसांनी आरोपीला 25 डिसेंबर रोजी अटक केली.
हे वाचलंत का :