कोलकाता - भारत-न्यूझीलंडमधील तीन सामन्यांच्या मालिकेतील कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडचा 73 धावांनी पराभव केला. पहिले दोन सामनेही भारताने या मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. आज खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडला चारीमुंड्या चीत करत भारताने मालिकेवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे.
आजच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात सात बाद 184 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ( सर्वाधिक 56 धावा केल्या. दीपक चहरने 8 चेंडूत झटपट 21 धावा काढून भारताची धावसंख्या 184 वर पोहोचवली. 185 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची खराब सुरुवात झाली. मार्टिन गुप्टिल आणि डॅरिल मिशेल यांनी पहिल्या विकेटसाठी 13 चेंडूत 21 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी अक्षर पटेलने मिशेलला (5) बाद करून तोडली. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर अक्षरने मार्क चॅपमनला (0) ऋषभ पंतला यष्टीमागे त्रिफळाचीत केले. अक्षरने आपली घातक गोलंदाजी सुरू ठेवली आणि पुढच्याच षटकात ग्लेन फिलिप्सचा (0) बळी घेतला. 30 धावांतच न्यूझीलंडचे 3 आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. 10 षटकात न्यूझीलंडने 3 गडी गमावून 68 धावा केल्या. त्यानंतर लोकी फर्गुसन 14 व सिफर्ट 17 या दोघांनाच दोन अंकी धावसंख्या गाठता आली. न्यूझीलंडचा डाव 17.2 षटकात 111 धावांत आटोपला व भारताने हा सामना 73 धावांनी जिंकला. भारताकडून अक्षर पटेलने तीन तर हर्षल पटेलने 2 बळी घेतले. दीपक चहर, युझवेंद्र चहल व व्यंकटेश अय्यर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेतला.