मुंबई - देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी पुरस्कारासाठी बीसीसीआय भारतीय महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू मिताली राज आणि अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्या नावाची शिफारस करणार आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी अनुभवी फलंदाज शिखर धवन, लोकेश राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची नावे पाठवण्यात येणार आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आज बुधवारी यांची माहिती दिली.
बीसीसीआयच्या अधिकारीने सांगितलं की, अर्जुन पुरस्कारासाठी आतापर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूच्या नावाची शिफारस करण्यात आलेली नव्हती. पण यंदाच्या वेळी खेलरत्नसाठी मिताली राजच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, क्रीडा मंत्रालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेली समिती पुरस्कारासाठी खेळाडूची अंतिम निवड करेल.
मिताली राजची कामगिरी -
मिताली राज हिने मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्ष पूर्ण केली आहे. ३८ वर्षीय मितालीने सात हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. ती आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज आहे. मितालीला याआधी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रविचंद्रन अश्विनची कामगिरी -
फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने ७९ कसोटी सामन्यात ४१३ गडी बाद केले आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुक्रमे १५० आणि ४२ गडी बाद केले आहेत.
शिखर धवन याने १४२ एकदिवसीय सामन्यात ५ हजार ९७७ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये २ हजार ३१५ धावा आहेत. तर टी-२० त्याच्या नावे १ हजार ६७३ धावांची नोंद आहे. दरम्यान, मागील वर्षी शिखर धवनचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले होते. परंतु, त्याची निवड झालेली नव्हती.
हेही वाचा - Eng vs SL: पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा श्रीलंकेवर मोठा विजय, ९१ चेंडू राखत जिंकला सामना
हेही वाचा - आदिती अशोक ठरली Tokyo Olympics साठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू