दुबई - इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने चांगली कामगिरी केली. याचा त्याला फायदा झाला आहे. जसप्रीत बुमराहचे नाव आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हा पुरस्कार प्रत्येक महिन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. ऑगस्ट महिन्यासाठी जसप्रीत बुमराहला नामांकन मिळालं आहे.
जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्यात 9 गडी बाद केले. यानंतर त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले. त्याने मोहम्मद शमीसोबत नवव्या गड्यासाठी 89 धावांची भागिदारी केली. ही भागिदारी निर्णायक ठरली आणि भारताने हा सामना 151 धावांनी जिंकला.
जसप्रीत बुमराहसोबत हे देखील शर्यतीत
आयसीसी प्लेयर ऑफ द मॅथ पुरस्कारासाठी जसप्रीत बुमराह सोबत आणखी दोन खेळाडू शर्यतीत आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी हे देखील शर्यतीत आहेत. जो रूटने भारताविरोधातील मालिकेत तीन कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. तर शाहिन शाह आफ्रिदीची निवड वेस्ट इंडिजविरुद्धच्या कामगिरीच्या जोरावर झाली आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध 18 गडी बाद केले. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने 10 गडी बाद करण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा सर्वात युवा गोलंदाज ठरला.
महिला गटात या खेळाडूंमध्ये चुरस
महिला गटात आयसीसी पुरस्कारासाठी थायलँडची नत्ताया बुचाथाम, आयर्लंडची गॅबी लुईस आणि एमियर रिचर्डसन या शर्यतीत आहेत. नत्तायाने झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी नोंदवली. तिच्या कामगिरीच्या जोरावर थायलँडने मालिका 2-1 ने जिंकली. आयर्लंडची लुईस आणि रिचर्डसन यांनी टी-20 विश्व कप पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली. त्याच्या कामगिरीच्या जोरावर आयर्लंडने पात्रता फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले.
हेही वाचा - सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह करतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर
हेही वाचा - England vs India : अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 291 धावांची गरज